सोलापूर

सोलापूर : उजनीतील गाळ काढण्यास मुहूर्त कधी?

दिनेश चोरगे

कंदर; पुढारी वृत्तसेवा :  उजनी धरणात मागील 42 वर्षांत साठलेला गाळ काढण्यासाठी शासन स्तरावर अनेकवेळा आमदार आणि खासदारांनी आवाज उठविला, समित्या नेमल्या. सर्व्हे झाले, निविदाही काढण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात गाळ काढण्याची प्रक्रिया अद्याप झाली नसल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमालीची कमी झाली आहे. गाळ काढण्यास मुहूर्त कधी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

उजनी धरणाची साठवण क्षमता 123 एवढी असली तरी त्यातील उपयुक्त साठा 54 टीएमसी एवढा आहे. मृतसाठा 63 टीएमसी आहे. 6 टीएमसी पाणी अतिरिक्त समजले जाते. उजनी धरणात 14 हजार 854 चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्र आहे. पावसाळ्यात या भागातून वाहत आलेला गाळ धरणाच्या मृत व उपयुक्त जलासाठ्यात पसरल्याने कागदावरील जलसाठा व प्रत्यक्ष साठा यांच्यात फरक पडत आहे.
धरणाची साठवण क्षमता सुमारे 30 ते 32 टीएमसीने कमी झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने 2007 मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार उजनी धरणात 12.77 टक्के इतका गाळ होता, तर 2011 मध्ये केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या आदेशानुसार दिल्ली स्थित तेजो विकास इंटरनॅशनल या खासगी संस्थेने डीजीपीएस या विशेष यंत्रणेव्दारे केलेल्या सर्वेक्षणानुसार उजनी धरणातील गाळमिश्रित वाळूचे प्रमाण 27.94 टक्के होते. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 32 टीएमसीने कमी झाली.

निर्णय झाला; कार्यवाही शून्यच

2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आलेल्या निविदा कागदावर त्रुटी असणे आणि अंतर्गत विरोध असल्याने हा निर्णय रद्द झाला. 18 जुलै 2022 रोजी राज्य शासनाने राज्यातील उजनीसह पाच धरणांतील गाळ काढण्याची निविदा तयार करण्यासाठी समिती नेमली. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र समितीचा अहवाल कोठे गेला, असा प्रश्न निर्माण झाला असून धरणातील गाळ कधी निघणार, हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT