हातातोंडाशी आलेला गहू जळून खाक, कष्टाने पिकवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राख! File Photo
सोलापूर

हातातोंडाशी आलेला गहू जळून खाक, कष्टाने पिकवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राख!

गहू पिकासह ड्रीप मोटर वायर पाईप जळून साडेतीन लाखाचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

गुळवंची : पुढारी वृत्तसेवा

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील शेतकऱ्यांवर ऐन गहू काढणीच्या काळातच शिमगा करण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र (शनिवार) पाहावयास मिळाले. अपार कष्ट करून जपलेला आणि हातातोंडाशी आलेला दोन एकर गहू जळून खाक झाल्याची घटना कारंबा शिवारामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, सोलापूर-बार्शी रोडवरील कारंबा शिवारातील गट नंबर ८२/१/ब/१ मध्ये शेतकरी शशिकांत पार्लेकर यांनी रब्बी हंगामात शेतात तीन एकर गहूची पेरणी केली होती. शनिवारी दुपारी अडीच वाजता शेजारील शेतकरी यांनी गव्हाला आग लागल्याची माहिती फोनद्वारे दिली. शेतात आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ शेतकरी पार्लेकर शेतात आले. तोपर्यंत सलीम देशमुख यांच्या शेतातील शेतमजूर व शेजारच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असता, त्यांना यश आले परंतु तोपर्यंत दोन एकर गहु जळून खाक झाला होता. यावेळी गव्हाला पाणी देण्यासाठी केलेले ड्रीप, मोटार, पाईपलाईन वायर देखील जळून गेली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद दिली असून, दोन एकर गहु पिकासह ड्रीप पाईप वायर असे एकूण तीन लाख पन्नास हजार रूपये नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. विद्युत तारांच्या घर्षणामुळे वाळलेल्या गव्हात ठिणगी पडून गहु पेटल्याची शक्यता यामध्ये नमूद करण्यात आली आहे. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल धुमाळ व तलाठी प्रविण जारवाल यांनी घटनेचा पंचनामा केला असून वीज वितरण कर्मचारी उद्या भेट देणार आहेत अशी माहिती शेतकऱ्याने दिली.

रब्बी हंगामात तीन एकर गहु पिकाची लागवड केली होती. मागील महिन्यात चांगला गव्हाचा प्लॉट आहे म्हणून याच ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. काढणीला आलेला गहु येत्या दोन - तीन दिवसांत काढायचा होता. परंतु गव्हाला आग लागली असून त्याबरोबर ड्रीप, पाईप, मोटार, वायर जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-शशिकांत पार्लेकर नुकसानग्रस्त शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT