सोलापूर : प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी डॉ. उमा आणि मुलगी स्नेहा असल्याचे सांगितले गेले.
त्यावेळी त्यांचा मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली कुठे होते, याची चर्चा सुरू झाली आहे. डॉ. शिरीष यांनी गोळी मारून घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये आणताना त्यांच्यावर अगोदरच ड्रेसिंग केले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. त्यामुळे डॉ. शिरीष यांच्यावर ड्रेसिंग कुणी केले, त्यांच्यावर घरीच प्रथमोपचार केले होते का, डॉ. उमा किंवा मुलगी स्नेहा हे ड्रेसिंग करण्याच्या मानसिकतेत होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
डॉ. शिरीष यांनी आत्महत्येच्या दिवशी पत्नी आणि मुलीसोबत जेवण केले, गप्पा मारल्या. आठच्या सुमारास बेडरूमधून बाथरूमध्ये गेले. स्वतःच्या पिस्टलमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज ऐकून पत्नी आणि मुलगी लागलीच बाथरूमकडे धावले. अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना लागलीच हॉस्पिटलमध्ये आणले. हा घटनाक्रम सांगण्यात आला.
परंतु हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांच्यावर अगोदरच ड्रेसिंग केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्यावेळी घरी केवळ पत्नी आणि मुलगी होती तर मग त्यांच्यावर ड्रेसिंग कुणी केले. डॉ. उमा किंवा मुलगी स्नेहा हे ड्रेसिंग करण्याच्या मानसिकतेत होते का, अॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर किंवा हाऊसमन होते का, त्यांनी प्रथमोपचार केले तर अॅम्ब्युलन्समध्ये रक्ताचे डाग का नाहीत. डॉ. शिरीष यांच्यावर घरीच प्रथमोपचार केले गेले तर ते कुणी केले.
या सर्व घडामोडीत त्यांचा मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली हे दोघे कुठे होते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची चौकशीही होण्याची गरज आहे. हॉस्पिटल आणि घरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी जप्त केले आहेत. त्या आधारे याचा उलगडा पोलीसांना करावा लागेल.