सोलापूर : वळसंगकर कुटुंबीय आणि राऊत भगिनींच्या मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशनमुळे सत्य बाहेर येईल, आम्हाला बचाव करताना त्याचा उपयोग होईल, असा दावा मनीषाच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात केला तर सरकार पक्षाने सीडीआर आणि टॉवर लोकेशनची सध्या गरज नसून ते बचावावेळी वापरता येईल, असा युक्तिवाद केला.
सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. त्याचबरोबर वळसंगकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची तसेच तिचा मोबाईल मिळण्याची मागणी केली होती. या अर्जांपैकी दोषमुक्तीचा अर्ज वगळता इतर दोन अर्जांवर गुरुवारी (दि. 4) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.
दोन्ही बाजूंनी याबाबत युक्तिवाद करण्यात आला. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यानंतर करण्यात आलेला स्पॉट पंचनामा यामध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रत्येकाच्या जबाबात विसंगती आहे. पोलिसांनी त्याठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज घेतलेले नाही. बाजूच्या दर्बी कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज घेतले नाही. प्रथमदर्शीचा जबाबच नोंदवलेला नसल्याच्या गोष्टी मनीषाचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयासमोर मांडल्या.
रोहिणी राऊत आणि प्राजक्ता राऊत यांचे डॉ. शिरीष वळसंगकर यांना शेवटच्या तीन दिवसात 11 कॉल आहेत. तसेच डॉ. शिरीष यांच्या आत्महत्या अगोदर प्राजक्ताचे तीन कॉल आहेत. त्यावेळी दोघी कुठे होत्या, हे टॉवर लोकेशनवरुन समजेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. मनीषाचा मोबाईल केवळ जप्त केला आहे. त्यात काय आढळले, याचा कुठेच उल्लेख नाही, त्यामुळे तो खराब होण्यापेक्षा आम्हाला मिळावा, असेही नवगिरे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे सरकार पक्षाच्यावतीने दोन्ही अर्जाबाबत आक्षेप घेण्यात आले. आम्ही चार महिन्यांचे सीडीआर मागवले आहेत. त्याचबरोबर मनीषाचा मोबाईल पुराव्याच्या अनुषंगाने देऊ नये, असा युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायाधीश जयदीप माहिते हे या दोन अर्जांवर 6 डिसेंबर रोजी निकाल देणार आहेत. या खटल्यात मनीषा मुसळे-माने हिच्यातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत हे काम पाहत आहेत.
मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर सुनावणी झालीच नाही
मनीषाने प्रामुख्याने या खटल्यात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र न्यायालयाने इतर दोन अर्जांवर प्रथम सुनावणी घेतली. दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी झालीच नाही. आता 6 डिसेंबर रोजी दोन अर्जावर निकाल येणार आहे. परंतु दोषमुक्तीच्या अर्जावर त्यानंतर सुनावणी आणि युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे सत्य सीडीआर आणि टॉवर लोकेशनद्वारे बाहेर येण्यास मदत होईल. आमच्या बचावासाठी ते उपयोगी ठरणार आहे. रोहिणी राऊत आणि प्राजक्ता राऊत यांचे शेवटच्या तीन दिवसात 11 कॉल आहेत. डॉक्टरांच्या आत्महत्येपूर्वी प्राजक्ताचे तीन कॉल आहेत. हे सर्व संशयास्पद आहे. सत्य बाहेर येण्यासाठी सीडीआर आणि टॉवर लोकेशन मिळणे महत्त्वाचे आहे.-ॲड. प्रशांत नवगिरे, मनीषाचे वकील