सोलापूर : न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मंगळवारी (दि. 6) आणखी एक ट्विस्ट समोर आला. या प्रकरणातील तपास अधिकार्यांना उद्देशून डॉ. शोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी लिहिलेले निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झाले. विविध वृत्तपत्रे व सोशल मीडियाद्वारे होणारी मानहानी रोखण्याविषयी हे निवेदन आहे.
मात्र, हे निवेदन ना कोणत्या अधिकृत लेटर पॅडवर आहे, ना त्याखाली केलेल्या स्वाक्षर्यांची पुष्टी होण्यासाठी शिक्का आहे. त्यामुळे या निवेदनाबाबत संभ्रमावस्था आहे. तर दुसर्या बाजूला हे निवेदन म्हणजे माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त होत आहे. असे असले तरी सोशल मीडियावर व्हायरल ‘ते’ निवेदन व त्याच्या लेखनकर्त्यांच्या सत्यतेची ‘पुढारी’ माध्यम समूह पुष्टी करत नाही.
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक लकडे यांच्या नावे असलेल्या या निवेदनात लिहिलेल्या मजकुराचा संपादित आशय असा ः डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न माध्यमे करत आहेत. त्यासाठी माझ्यासह वडील डॉ. दिलीप जोशी याच्या नावाचा, नात्याचा, फोटोंचा परवानगीशिवाय वापर करून कुठल्याही पुराव्याशिवाय खोटी बातमी पसरवत आहेत.
आम्ही गावात असतानाही आम्ही देश सोडून गेल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली. प्रकरणाचा तपास सुरू असतानाही विचित्र थेअरी मांडून आरोपीचा बचाव करणे व जनतेमध्ये माझ्यासह वडिलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हॉस्पिटलची अंतर्गत माहिती हॉस्पिटलमधील मनीषाचे सहकारी पसरवत असावेत अशी आम्हाला शंका आहे. चुकीची माहिती देऊन आमचे मानसिक खच्चीकरण करून, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय आमची मानहानी करण्यात येत आहे. तरी आमची प्रतिमा मलिन करणार्या माध्यमांवर कारवाई करावी, त्यांना योग्य समज द्यावी, अशी विनंती या पत्रात डॉ. शोनाली वळसंगकर आणि डॉ. दिलीप जोशी यांच्या नावे या निवेदनात करण्यात आली आहे.