सोलापूर ः प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने-मुसळेच्या दोषमुक्त अर्जावर 16 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. अर्ज दिल्यानंतर सहा महिन्यानंतर पहिली सुनावणी ठेवण्यात आली आहे.
डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांचे मोबाईल सीडीआर व टॉवर लोकेशन द्यावे, तसेच या खटल्यात संशयित आरोपी मनीषाला दोषमुक्त करावे, असा अर्ज मनीषाचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सप्टेंबर महिन्यात दिला होता. या अर्जापैकी सहा महिन्यांत मोबाईलचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन देण्याबाबत तारखा झाल्या; परंतु दोषमुक्तीच्या अर्जावर एकही सुनावणी झाली नव्हती. शुक्रवारी (दि. 13) सीडीआर आणि टॉवर लोकेशनबाबत सुनावणी होती. यावेळी दोन्हींच्या फाईलचे पासवर्ड सरकार पक्षाने मनीषाच्या वकिलांना दिले. त्यामुळे त्या अर्जाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आता मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी लगेच 16 मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर काम पाहत आहेत.
सीडीआर देण्यास टाळाटाळ का?
डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांचे सीडीसार व टॉवर लोकेशन सरकार पक्षाने नऊ मार्च रोजी सीडीच्या माध्यमातून जमा केले. परंतु सदर सीडीत मोबाईल क्रमांकाचा सीडीआर व टॉवर लोकेशनचा डाटा हा प्रोटेक्टेड होता, त्यास पासवर्ड होता. त्यामुळे डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांच्या सीडीआर व टॉवर लोकेशनची माहिती मिळू शकली नाही. शुक्रवारी यावर न्यायालयात सुनावणी होती. त्या दरम्यान सरकार पक्षाने सीडीमधील फाईलचे पासवर्ड न्यायालयात जमा केले. मुळात पासवर्ड होते तर ते नऊ मार्च रोजीच का देण्यात आले नाहीत. सरकार पक्षाने सीडीआर व टॉवर लोकेशन देण्यास एवढी टाळाटाळ का केली गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.