सोलापूर : न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात डॉ. वळसंगकर कुटुंबिय आणि इतर दोघांचे पाच महिन्याचे सीडीआर काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वी शेवटच्या तीन दिवसांत एकाच मोबाईलवरून 11 वेळा फोन करणारी मतीफ व्यक्ती कोण याचा तपास लागण्यासाठी सीडीआर आणि टॉवर लोकेशन मिळण्याचा अर्ज न्यायालयात करण्यात आला.
मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत हा अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्यावर सरकार पक्षाने तसेच तपास अधिकाऱ्यांनीही म्हणणे मांडले. एकूण सात जणांचे पाच महिन्यांतील सीडीआर मिळवण्यासाठी परिमंडळ कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. माहिती प्राप्त होताच न्यायालयात सादर करणार असल्याचेही म्हणाले.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येस सात महिने पूर्ण होत आहेत. न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले. त्यामध्ये शेवटच्या चार दिवसांत कुटुंबासह पाच जणांचे कॉल केलेल्यांचे डिटेल्स तपास अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. चार दिवसामध्ये दोन फोनवरून जास्त कॉल आल्याचे दिसले. फिर्यादी अश्विन वळसंगकर, डॉ. उमा वळसंगकर, डॉ. शोनाली वळसंगकर, नेहा फडके आणि साक्षीदार प्राजक्ता राऊत, आणखी एका मोबाईलवरून घटनेपूर्वीच्या पाच महिन्यांचे सीडीआर व टॉवर लोकेशन मिळण्याकरिता ॲड. नवगिरे यांनी अर्ज दाखल केला होता. कारण 18 एप्रिल रोजी आत्महत्येची घटना घडण्याच्या आगोदर 16 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान तीन दिवस डॉक्टरांचा एकाच मोबाइलवरून 11 वेळा संवाद झाल्याचे दिसून येते. हे 11 कॉल करणारी व्यक्ती कोण? त्याचा उलगडा झाला तर वस्तुस्थिती समोर येईल, असे ॲड. नवगिरे यांनी सांगितले.