सोलापूर ः डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली मनिषा मुसळे-माने हिला पोलीस कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते. पोलीसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला. या झडती तिच्या कपाटात 75 लाखांचे सोने, बिलाची व्हाऊचर आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढे सोने सापडले असेल तर पोलीसांनी याची माहिती जाहीर का केली नाही याची चर्चा होत आहे.
मनिषाला गुरूवारी (दि. 24) तपासकामासाठी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये आणले होते. तिच्या केबिनची झडती घेतली. ती वापरत असलेला संगणक जप्त केला. कपाटही तपासले. या कपाटात तिने ठेवलेले 75 लाखांचे सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या प्रमाणात सोने सापडल्याने पोलीसही अचंबित झाले होते. सोन्याबरोबरच बिलाची व्हाऊचर आणि काही कागदपत्रे पोलीसांनी जप्त केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने सापडले असेल तर पोलीसांनी याची माहिती माध्यमांना का दिली नाही. तपास कामात याचा उल्लेख केला आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. मनिषाचे कपाट तपासताना काही साक्षीदार आणि पंचही हजर होते. त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांची अत्यंत विश्वासू असलेली मनिषा गेल्या 20 वर्षांपासून वळसंगकर कुटुंबियांच्या अत्यंत जवळची होती. साध्या कर्मचार्यापासून ते हॉस्पिटलच्या अधिकारीपदापर्यंत तिने मजल मारली. या काळात तिने प्रचंड पैसा मिळवला. हॉस्पिटलच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली. कोट्यवधींचा बंगला बांधला. तिचे राहणीमान बदलले होते. ती सोन्यामध्ये गुंतुवणूक करीत होती. नवर्यापासून लपवून ती सोने हॉस्पिटलमधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवत होती, याची चर्चा पूर्वीपासून हॉस्पिटलच्या कर्मचार्यांमध्ये होती.