सोलापूर : राज्यातील ज्येष्ठ नेते शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (दि.४) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सोलापुरातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सोलापूरशी डी. वाय. पाटील यांचे निकटचे स्नेहबंध होते. त्यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आणि डी. वाय. पाटील यांचे कमालीचे सख्य होते. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, कौटुंबिक स्नेह समारंभामध्ये त्यांची उपस्थिती आवर्जून असायची. सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सव समितीचे ते प्रमुख होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ते जवळपास ४० दिवस हॉटेल बालाजी सरोवर येथे थांबले होते. सोलापूरच्या मसाप शाखेला सर्वात मोठी म्हणजे पाच लाखांची देणगी दिली होती.
धारवाड येथील कुमारस्वामीजी यांचे ते निस्सिम भक्त होते. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना ते स्वामीजींचा आशीर्वाद घेत असत. सोलापुरात विजापूर रोडवरील इंदिरा नगर येथे महातपस्वी कुमारस्वामी योग विहार येथे ते तीन वेळा आले होते. सिध्देश्वर वन विहारातील काव्य उद्यानातही ते अनेकदा आले. तेथील काम पाहून त्यांनी त्यावेळी रोटरी क्लबला ३३ हजार रुपयांची देणगी दिली. यांच्या आई-वडिलांच्या नावे तेथे तीन कवितास्तंभ आहेत.
धारवाडच्या कुमारस्वामीजींचे परमभक्त डॉ. डी. वाय. पाटील आणि आमचे गेल्या २५ वर्षापासून सान्निध्य होते. ते धारवाडच्या कुमारस्वामीजींचे परमभक्त होते. मोठे निर्णय ते स्वामींच्या आशीर्वादाने करत. इंदिरा नगरचे संस्थापक मडकी यांच्या मुलीचे ॲडमिशन करताना त्यांनी कोणतीही फी आकारली नाही. अनेक गरजूंना त्यांना मदत केली. एवढे मोठे काम करताना त्यांनी नेहमी मदत केली. त्यांचे एक वाक्य होते, इगो इज डेथ ऑफ लाईफ, ॲण्ड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या जाण्याने सर्वांना फार दुःख झाले. -राजेंद्र मायनाळ, सोलापूर
के. भोगिशियन शिवाजी विद्यापीठात कुलगुरू असताना त्यांनी डी. वाय. पाटील यांना शैक्षणिक इन्स्टिट्यूट काढण्याचा कानमंत्र दिला. त्यानंतर डी.वाय. पाटील यांनी राज्यभरात शैक्षणिक संस्था काढल्या. सोलापुरात रोटरी क्लबच्या वतीने सिध्देश्वर वन विहारात प्रोजेक्ट सुरू केला. तिथे त्यांनी देणगीही दिली. त्यांच्या आई-वडिलांच्या नावे तेथे तीन कवितांचा स्तंभही उभारला आहे.- ॲड. जे. जे. कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ