ठळक मुद्दे
डीजेचा कर्णकर्कर्श दणदणाट थांबणार
पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार
सोलापूर ध्वनी प्रदूषणातून मुक्त होणार
Solapur Ganpati Festival Dj ban Movement
संजय पाठक
सोलापूर : शहराला ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात ढकलणार्या ‘डीजे’ नावाच्या राक्षसाची सोलापुरातून अखेर हद्दपारी सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक ‘पुढारी’ने ‘डीजे’ बंदीसाठी उभारलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला आणि जनमताच्या रेट्याला अखेर भव्य यश आले आहे. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर शहरातील प्रतिष्ठित आणि अग्रगण्य समजल्या जाणार्या चौपाड येथील थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाने यंदापासून ‘डीजे’ला पूर्णपणे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंडळाचे आधारस्तंभ अमोलबापू शिंदे यांनी हा धाडसी पुढाकार घेत सोलापुरातील गणेशोत्सवाला पुन्हा पारंपरिक आणि मंगलमय स्वरूप देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
लोकभावनेचा आदर करत सोलापुरात अखेर ‘डीजे’ बंदीस सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून ‘डीजे’च्या विषयावरून शहरात मोठे वैचारिक मंथन सुरू होते. पोलीस खात्याने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतही यावर जोरदार चर्चा झाली. याच बैठकीत अमोलबापू शिंदे यांनी ‘डीजे’च्या कर्णकर्कश संस्कृतीविरुद्ध आपली स्पष्ट आणि परखड भूमिका मांडत इतर मंडळांनाही या सकारात्मक बदलासाठी आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला आता कृतीची जोड मिळाली आहे.
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळ हे केवळ मोठ्या मूर्तीसाठीच नव्हे, तर आपल्या शिस्तबद्ध आणि आकर्षक लेझीम पथकासाठीही ओळखले जाते. ‘डीजे’ बंदीच्या निर्णयानंतर या मंडळाने उत्सवाच्या परंपरेला अधिक उजाळा देण्याचे ठरवले आहे. ‘डीजे’ला कायमचा रामराम ठोकत या मंडळाने यापुढे कोणत्याही उत्सवात ‘डीजे’चा वापर न करण्याची शपथ घेतली आहे.
पारंपरिक वाद्यांना अग्रक्रम
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या मिरवणुकीत लेझीम, झांज आणि गजढोल यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा निनाद घुमणार आहे. एकाच रंगाच्या पोशाखात, लयबद्ध हालचाली करत आणि मंगलमय सुरांच्या तालावर निघणारी ही मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सामाजिक संदेशाचा फलक
आम्ही ‘डीजे’ बंदीच्या बाजूने आहोत. सोलापूरकरांच्या भावनांचा आदर करत आम्ही हा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे मोठे फलक गणेशोत्सव काळात मंडळातर्फे लावण्यात येणार आहेत. या निर्णयास मंडळाचे प्रमुख पदाधिकारी संकेत पिसे, अनिकेत पिसे, प्रताप चव्हाण, सुजीत खुर्द, अमित पवार, रमेश खरात, अमोल कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी एकमताने पाठिंबा दिला आहे.
आता प्रतीक्षा इतर मंडळांच्या घोषणेची...
थोरला मंगळवेढा तालमीने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. कर्णकर्कश आवाजापेक्षा संस्कृती आणि परंपरा श्रेष्ठ आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील पारंपरिक वाद्ये बनवणार्या आणि वाजवणार्या कलाकारांनाही नवसंजीवनी मिळाली असून, बाजारात झांजा आणि गजढोल खरेदीसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसू लागली आहे. आता समस्त सोलापूरकरांना शहरातील अन्य मोठी गणेश मंडळेही या पवित्र कार्यात कधी सामील होतात आणि ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवाची घोषणा कधी करतात, याचीच प्रतीक्षा लागली आहे.