हातभट्टी नष्ट करताना भरारी पथकाचे अधिकारी Pudhari Photo
सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर जिल्हाभरात छापे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी (दि.29) संपूर्ण जिल्ह्यामध्ये हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी छापे मारले. या छाप्यांमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई केली. यामध्ये वीस ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये 520 लिटर हातभट्टी दारू, 21 हजार 280 लिटर रसायनासह दोन वाहने असा एकुण 9 लाख 18 हजार 602 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात आहे. याच पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.29) राबविलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरात भरारी पथकाने बेडरपूल येथे अर्जुन प्रकाश जाधव (वय.23, रा. मुळेगाव तांडा) याला दुचाकी क्रमांक (एमएच 13 सीएन 4511) वरुन शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मुळेगाव तांडा येथे छापा टाकला त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून 14 हजार 400 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. यावेळी पथकाने येथील अजय देसू जाधव (वय.27) याच्या ताब्यातून 2200 लिटर दारु आणि 200 लिटर रसायन जप्त करून नष्ट केले. याबरोबरच सिताराम तांडा येथील हातभट्टीवरील छाप्यात 4900 लिटर रसायन जाळण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी हद्दीतील ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी 450 लिटर रसायन नाश करण्यात आले.

या बरोबरच माळशिरस विभागाचे पथकाने सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या हद्दीतील हातभट्टीवर छापे टाकून शंकर मोहन चव्हाण (वय.40रा. निमगाव) याला 500 लिटर रसायन आणि 70 लिटर हातभट्टी दारूसह अटक केली. तसेच महूद येथील दत्तू भगवान जाधव यांच्या घरातून 230 लिटर रसायन जप्त करून नाश केले. या पथकाने महूद गावाच्या हद्दीतील बेघरवस्ती या ठिकाणी एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 400 लिटर रसायन जागीच नाश केले. निरीक्षक अ विभागाचे पथकाने सोलापूर शहर परिसरातील विनायक नगर एमआयडीसी रोड परिसरात व्यंकटेश सोमनाथ दोमल याच्या ताब्यातून 650 लिटर क्षमतेचे 96 फ्रुट बिअरच्या बाटल्या, बापूजी नगर परिसरात अंजनप्पा हणमंतु म्हेत्रे याच्या ताब्यातून 48 फ्रुट बियरच्या बॉटल तसेच राधाबाई भिमण्णा अनमोललू या महिलेच्या ताब्यातून 120 फ्रुट बियरच्या बॉटल जप्त केल्या आहेत.

एका अन्य कारवाईत इंदिरानगर परिसरातील राजू विलास बंदपट्टे याच्या ताब्यातून 30लिटर हातभट्टी दारू, जुना कुंभारी नाका परिसरातील हणमंतु विष्णू देशमुख याच्या ताब्यातून 23 लिटर हातभट्टी दारु तसेच गवळी वस्ती एमआयडीसी रोड परिसरातील लक्ष्मण हणमंतु कोंगारी याच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने मरीआई चौकात एका इसमास त्याच्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी 125 मोटरसायकल क्रमांक एमएच 13 डीयु 5312 वरून रबरी ट्यूब मध्ये 60 लिटर दारूची वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी मोटरसायकल जागेवरच सोडून फरार झाला. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, सचिन भवड, पंकज कुंभार , दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, अंजली सरवदे, सुखदेव सिद, समाधान शेळके, सुरेश झगडे, धनाजी पोवार, सौरभ भोसले ,बाळू नेवसे, दत्तात्रय पाटील ,श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, जीवन मुंढे, गजानन होळकर व जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT