सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून बिनविरोध निवडीसाठी करण्यात आलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. आता भाजपचे उमेदवार बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पंढरपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत राजकीय रंगत निर्माण झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोपानंतर उमेदवार रमेश बारसकर, महेश साठे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तसेच अन्य उमेदवार धनंजय डिकोळे, जीवन बारसकर, नागेश अक्कलकोटे यांनीही माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात आता राऊत आणि देशमुख दोघांचेच अर्ज उरले. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने उमेदवार बिनविरोध निवडून यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेतला . मात्र, विरोधकांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लागली. माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्यातील ही लढत प्रतिष्ठेची बनली असून मतदानादिवशी कोणाचे राजकीय गणित अचूक ठरते, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोलापूरच्या राजकारणात या निवडणुकीमुळे नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळातील राजकीय समीकरणांवरही या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदान १८ जून रोजी; एकूण ६१६ मतदार
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान प्रांताधिकारी कार्यालयात आहे. मतमोजणी २२ जून रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. महापालिकेचे १११, जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापती ७९, नगरपालिका, नगरपंचायतीचे ४२६ असे एकूण ६१६ मतदार हे मतदान करणार आहेत.
अपक्ष पाच उमेदवारांची माघार
अपक्ष उमेदवार जीवन जानकर, नागेश अक्कलकोटे, रमेश बारसकर, महेश साठे, धनंजय डिकोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. बारसकर, साठे व अक्कलकोट यांनी महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे. मात्र जीवन जानकर, धनंजय डिकोळे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
मोहिते पाटील, सोपल सक्रिय
बार्शीतून राजेंद्र राऊत उमेदवार असल्याने काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर आ. दिलीप सोपल हे सक्रिय झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वसंतनाना देशमुख यांना उमेदवारी दिल्याने सोपल समर्थक बार्शीचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी अर्ज माघार घेतला. खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनीही पडद्याआडून सक्रिय होत जीवन जानकर यांचा अर्ज माघारी घेत देशमुख यांचा अर्ज कायम ठेवत निवडणूक एकास एक करण्याचे संकेत दिले. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
म्हेत्रेंसोबत आले साठे, डिकोळे
उमदेवारी अर्ज माघारीसाठी एक तासाचा अवधी असताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे उमेदवार महेश साठे, उमेदवार धनंजय डिकोळे यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी महापालिकेतील भाजपचे गटनेते नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण सोबत होते. पालकमंत्री गोरे हे होटगी रोडवरील पंचातारांकित हॉटेलमध्ये बसून निवडणुकीची सूत्रे हलवत होते.