सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळणार असून, शिवाजी सावंत यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार, हे निश्चित आहे. तर माजी आ. राजन पाटील, माजी आ. दिलीप माने यांच्यासह अनेक जण भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने यांच्या पॅनलने निवडणूक लढवून सत्ता मिळविली होती. तर आ. कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या उपस्थितीत जाहिर कार्यक्रम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर माने, पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या राजकीय चर्चेला जोर आला होता. या मुद्यांवर भारतीय जनता पार्टीचे विचार अंगीकारुन जे पक्षात येऊ इच्छितात त्यांचा नक्कीच प्रवेश होणार आहे. ते भाजपाच्या विचाराने काम करण्यास तयार आहेत. माजी आ.दिलीप माने, माजी आ.राजन पाटील हेही भाजपाच्या संपर्कात आहेत. लवकरच अनेक नेते भाजपात दिसतील असे गोरे म्हणाले.तर शिवाजी सावंत हे माढा तालुक्यातील मोठे राजकीय नेते असून, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याविषयी चर्चा झाली आहे. त्यामुळे शिवाजी सावंत यांचा लवकरच भाजपा प्रवेश होईल, असे गोरे यांनी सांगितले.