सोलापूर : डिजिटल अरेस्ट दाखवून 65 वर्षीय वृध्द महिलेला 43 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने शेवटी पैसे पाठवताना आयएफसी नंबर चुकवल्याने नऊ लाख रुपये मात्र वाचले. याबाबत सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरात एकट्या राहणाऱ्या 65 वर्षीय कस्तुरे नामक महिलेला सायबर फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी फोन केला. तुमच्या सीमकार्डचा वापर करुन पोर्न व्हिडिओ पाहण्यात आले आहेत. चुकीच्या कामांसाठी पैसे पाठवले आहेत. गोयल नामक व्यक्तीच्या खात्यातून तुम्हाला लाखो रुपये पाठविण्यात आले आहेत. तुमच्याविरोधात सीआयडी, ईडीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला लगेच मुंबईला यावे लागेल, अन्यथा अटक केली जाईल, अशी भीती दाखवली. तुम्हाला कधीही अटक केली जाऊ शकते. कॅमेऱ्यासमोरुन कोठे जायचे नाही, असे सांगून तडजोडीसाठी पैसे मागितले.
कस्तुरे यांनी त्यांच्या बँकेतील एफडी मोडून तब्बल 43 लाख रुपये त्यांना दिले. शेवटचे नऊ लाख रुपये देताना आयएफसी कोड चुकला आणि ते पैसे वाचले. मुलगी आणि जावई घरी आल्यानतंर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.