सोलापूर : अडचणीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बालकांसह गरजूंना तत्काळ मदत मिळावी, यासाठी सोलापूर पोलिस आयुक्तालयांतर्गत डायल 112 हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यात 2024 या वर्षभरात तब्बल 22 हजार 722 तक्रारी प्राप्त झाल्या. यात सात हजार 433 महिलांच्या मदतीला पथक धावले. अपघातस्थळी पोहोचून तब्बल 722 जखमींना मदत केली आहे.
दरम्यान, अडचणीत सापडलेल्या लोकांना तत्काळ पोलिस मदत मिळावी, यासाठी डायल 112 ही हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यावर कॉल येताच काही मिनिटांतच हे पथक घटनास्थळी दाखल होते. महिला, मुली, मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठी मदत होते. अपघाताची घटना घडल्यानंतर सर्वांत अगोदर डायल 112 चे पथकच दाखल होते. त्यामुळे अपघातग्रस्तांसाठी ही सेवा वरदानच ठरत आहे. विशेष म्हणजे, ज्याठिकाणी चारचाकी वाहन जात नाही, अशा ठिकाणी दुचाकीवरील पथक मदतीला धावत असल्याने अडचणीत सापडलेल्यांना दिलासा मिळतो.
डायल 112 वर कॉल केल्यानंतर हा कॉल नियंत्रण कक्षाला जातो. त्यानंतर ही माहिती तत्काळ संबंधित पोलिस ठाण्याच्या डायल 112 च्या पथकाला दिली जाते. त्यानुसार काही मिनिटांतच पथक घटनास्थळी दाखल होते. नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी आदींचे पथक 24 तास सतर्क असते.
डायल 112 वर कॉल केल्यास तत्काळ मदत मिळते. त्यामुळे अडचणीत सापडलेले नागरिक यावर कॉल करतात. वर्षभरात तब्बल 22 हजार 722 नागरिकांनी मदतीसाठी कॉल केले. यातील सर्व कॉलची दखल घेऊन त्याठिकाणी पोहोचून गरजूंना मदत केली.
डायल 112 वर आग, अपघात, चोरी, भांडण, मृतदेह, प्राणीसंबंधित, ज्येष्ठ नागरिक आदी संबंधित फोन आले आहेत. माहिती देण्यासाठीही कॉल आले आहेत, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणार्या डायल 112 वर मागील वर्षभरात जवळपास 22 हजारांच्या पुढे कॉल आले. यात सर्वाधिक महिलांबाबत तक्रारीचे कॉल होते. हे कॉल सोडविण्यास तत्काळ मदत केली. यापुढेही डायल 112 अंतर्गत येणार्या सर्व कॉलला प्रतिसाद देत हा विभाग सतर्क असेल.- राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), सोलापूर