नातेपुते : अकलूज येथील धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात सहपरिवार भेट घेतली. याविषयी मोहिते-पाटील यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून धवलसिंह हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. गेल्या तीन-चार दिवसांत धवलसिंह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठका झाल्या आहेत. यावरून धवलसिंह हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.
धवलसिंह हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि भाजपचे विद्यमान आ. रणजितसिंह मोहिते पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) माढा मतदार संघातील खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचे चुलत बंधू होत. धवलसिंह मोहिते-पाटील हे पूर्वी एकसंघ शिवसेनेचे जिल्हा सहप्रमुख होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याठिकाणी त्यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षपद भूषविले. दरम्यान, काँग्रेसमध्ये कुचंबणा होत असल्याने त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढवली आहे.
सध्या सुरू असलेल्या अकलूज नगरपरिषदेची निवडणूक धवलसिंह मोहिते-पाटील यांची जनसेवा संघटना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून लढविण्याविषयी धवलसिंह आणि उपमुख्यमंत्री पवारांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. अर्थात, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.