टेंभुर्णी : उजनी धरणातील आपले हक्काचे पाणी एआय डेटा सेंटरने चोरले आहे. यामुळे अजून वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पाणी जपून वापरले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी मोठा लढा, उभा करावा लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले. टेंभुर्णी येथे शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी शिवगौरी कॉम्प्लेक्स येथे मुस्लिम बांधवांसाठी दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा. मोहिते- पाटील बोलत होते.
कार्यक्रमास खा. ज्योती वाघमारे, माजी ज्येष्ठ आमदार शहाजी बापू पाटील, आमदार अभिजित पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके, बाळासाहेब पाटील, साईनाथ अभंगराव, रावसाहेब देशमुख, प्रमोद कुटे, पंचायत समिती सदस्य पोपट अनपट, पंचायत समिती सदस्या प्रतिभा खरात, युसूफ रस्तापुरे, सोलापूरचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, चरणराज चवरे, अनिल सावंत, अमर पाटील, रविना राठोड, मुबीना मुलाणी, दादा लवटे, धनंजय काळे, नितीन कापसे, माऊली सलगर, तात्या गोडगे, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, एका भावाने बहिणीस ओवाळणी म्हणून दिलेली खासदारकीची भेट हा सर्वात मोठा बहुमान आहे. नेहमी माणसातील माणूस शोधला पाहिजे. सुखात साथ देणारे नातेवाईक असतात तर दुःखात साथ देणारे फरिस्ते असतात. पक्ष, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांची सेवा करण्याची वेळ आली आहे.
आ. अभिजित पाटील म्हणाले की, ठिकठिकाणी समाज बांधव एकत्र येऊन अखंड भारताची अखंडता राखण्याचे काम करीत आहेत. अशा उपक्रमांतूनही हे काम आणखी चांगल्या पद्धतीने केले जात आहे. उजनी धरण १२३ टक्के भरूनही पाण्याची अडचण येत आहे, असे असताना नको ते प्रकल्प का लादत आहे? काळ संकटाचा असल्याने एकत्र येऊन काम केले पाहिजे. प्रास्ताविक संयोजक संजय कोकाटे यांनी केले.