माळशिरस : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व पुणे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माळशिरस येथील राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी चौक 61 फाटा या ठिकाणी आज (बुधवार) सकाळी 11 वाजता सकल धनगर समाजाच्यावतीने मेंढरांना घेवून रस्ता रोको अंदोलन केले. यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, या रस्तारोकोनंतर समाजाच्यावतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुरेश शेजुळ यांना देण्यात आले. रस्तारोको अंदोलन असल्याने सकाळपासूनच तालुक्यातील धनगर समाज बांधव आपल्या शेळ्या, मेंढ्यासह राष्ट्रीय महामार्गावर जमा झाले होते. रस्ता रोको आंदोलनास सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. महामार्गावरील दोन्ही महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी समाज बांधवांनी गजी ढोल हे पारंपारिक नृत्य सादर करून आरक्षण मिळावे, यासाठी जागर केला.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर, माळशिरसच्या नगराध्यक्ष ताई वावरे, तुकाराम देशमुख, गौतम माने, मधुकर पाटील, शिवाजीराव देशमुख, गणपतराव वाघमोडे, डॉ.मारुती पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे, लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, अॅड. सोमनाथ वाघमोडे, डॉ. समीर बंडगर, नगरसेविका रेश्माताई टेळे, सुरेश टेळे, मामासाहेब पांढरे, सोपानराव नारनवर, मारुती देशमुख, बाबासाहेब माने, विजय देशमुख, राहुल वाघमोडे, संतोष वाघमोडे, बाजीराव माने, संदीप पाटील, अजित बोरकर, सचिन टेळे, रघुनाथ चव्हाण, कैलास वामन, दादा शिंदे, बाळासाहेब वावरे, अजिनाथ वळकुंदे, शिवाजीराव सिद, श्यामराव बंडगर आदींसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी उत्तमराव जानकर, पांडुरंग वाघमोडे, अॅड. सोमनाथ वाघमोडे, रेश्मा टेळे, मारुती देशमुख यांनी धनगर, एसटी या प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल. असा सरकारला इशारा दिला आहे.
आंदोलनस्थळी उत्तम जानकर यांनी पंढरपूर येथे चाललेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून सर्व समाज बांधवांनी पंढरपूर येथे जाऊन पंढरपूर शहरात आपल्या समाजाच्या ताकतीने चक्काजाम करू. यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या घराला कुलूप लावून पंढरपूर येथे यावे, असे आवाहन केले. याची तारीख मी लवकरच जाहीर करीन असे त्यांनी सांगितले.