तुळजापुरात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कोल्‍हापूर जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला; २ जण ठार  Pudhari Photo
सोलापूर

तुळजापुरात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कोल्‍हापूर जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला; २ जण ठार

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर येथुन भवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कार पाठीमागून माल ट्रकला धडकली. या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (सोमवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सोलापूर – सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास ता. सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

सुखदेव बामणे (वय ४०) व नैनेश कोरे (३१) दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल शिवानंद कोरे (४२), रा. नांदणी, सुधीर चौगुले (३५) रा. वडगाव , सुरज विभुते (२१) रा. कोठली हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरुन बाजूला केली व जखमींना उपचाराकरता खासगी दवाखान्यात दाखल केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या वॅगनार कार मधून तुळजापूर येथे नवरात्री निमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर सोलापूर कडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे निघाले होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT