बार्शी ः छ. शिवाजी महाराजांचा अपमान कुणीही करू शकत नाही. कॉ. गोविंद पानसरे यांनी 1979 मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून सुरू असलेला वाद निरर्थक आहे. आता वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं. हे कृत्य असामाजिक, असंवेदनशील असे आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी तरी पुस्तक वाचले आहे की नाही, हे मला माहिती नाही. आंदोलन करणाऱ्यांना हे आंदोलन आपण का करतो आहोत, हे माहिती आहे की नाही, याची माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद उभा करायचा, चर्चेत राहायचे हे योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकावरून वाद घालणाऱ्यांना सुनावले.
श्री भगवंत प्रकटोत्सवानिमित्त महापूजेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बार्शीत आले. त्याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समावेत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आ. राजेंद्र राऊत होते. मुख्यमंत्री म्हणाले, भविष्यात केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशी मदत मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे.
ते पुढे म्हणाले, श्री भगवंताच्या दर्शनासाठी मी बार्शीत आलो होतो. मात्र राजाभाऊ राऊत यांची भगवंत प्रकट दिनाला येण्याचे निमंत्रण दिले. मलाही ही संधी हवी होती. त्यामुळे मला हे श्री भगवंताचे दर्शन लाभले. राजाभाऊ राऊत यांनी तयार केलेल्या आराखड्याला शासन सहकार्य करेल. ही जागा ऐतिहासिक आहे. पंढरपूरच्या धर्तीवर बार्शीतही श्री भगवंताची शासकीय महापूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावी या प्रश्नावर फडवणीस यांनी याबाबत विचार केला जाईल असे उत्तर दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिव जिल्हा परिषदे अध्यक्ष अर्चना पाटील, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, विजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, बार्शी पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, रणवीर राऊत आदी उपस्थित होते.