Ashadhi Ekadashi 2025 pudhari photo
सोलापूर

Ashadhi Ekadashi 2025 : बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्ती द्यावी; मुख्यमंत्र्यांचे पांडुरंग चरणी साकडे

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली.

मोहन कारंडे

Ashadhi Ekadashi 2025

पंढरपूर : पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (दि. ६) पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. नाशिक जिल्ह्यातील जाते येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या मानाच्या वारकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात वर्णन अशक्यप्राय आहे. आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अखंडितपणे सुरु आहे. मुघली आक्रमण व इंग्रजांच्या राजवटीतही ही परंपरा अव्याहतपणे सुरु राहिली. सातत्याने या परंपरेत वाढ होत जात आहे. दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे, राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करताना दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते. ही आपली संस्कृतीच अलौकिक आहे. विठ्ठल-रखुमाई हे आपले आराध्य दैवत आहे. सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी व सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी तसेच बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्तीही द्यावी अशी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय सावकारे, मंत्री आकाश फुंडकर, पंढरपूर देवस्थान मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिरे समितीचे पदाधिकारी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT