पंढरपूर : आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या जीवरक्षकांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करीत दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ केले. चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या ३५ हून अधिक वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात या जीवरक्षकांना यश मिळाले आहे.
यंदाच्या आषाढी वारीमध्ये ३२ लाखांहून अधिक वारकरी भाविक सोहळ्यासाठी दाखल झाले होते. एकादशी सोहळ्यासाठी येणारा प्रत्येक वारकरी भाविक हा चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी आवर्जून हजेरी लावतो.
चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी गेलेल्या वयोवृद्ध भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ३५ हून अधिक भाविक पाण्यात बुडाले होते. पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या भाविकांनी मदतीची हाक दिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवरक्षक टीमचे सदस्य पाण्यात स्वतःला झोकून देत जीव वाचवले.
आपल्या या कामाची दखल शासनस्तरावर कोणी तरी घ्यावी, या उद्देशाने जीवरक्षक टीमचे सदस्य साहिल माने यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची भेट घेऊन आपल्या कामाचे गाऱ्हाणे मांडले. श्री विठ्ठल मंदिर समितीच्या माध्यमातून आम्हाला कायमस्वरुपी काम द्या, अशी मागणी केली. या तरुणांचे नि:स्वार्थी काम आणि सेवाभाव पाहून चिवटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणली. शिंदे यांनी या जीवरक्षकांच्या कामाचे कौतुक करीत रुपये बक्षीस म्हणून देऊ केले.