पंढरपूर : एसटीच्या तिकीट भाडेवाढ झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचे काही कारण नाही. मी स्वत: परिवहन मंत्र्यांशी बोलून भाडेवाढ मागे घ्यायचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकार बिलकूल अडचणीत नाही, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने आज पंढरपुरात सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी ते पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, आमचे महायुतीचे सरकार जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी काम करत आहे. सरकारमध्ये आम्ही टीम म्हणून काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी ज्या खुर्चीवर आहोत त्या खुर्चीवरून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहोत.
राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असते. म्हणूनच हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने, विचाराने पुढे जात आहे, असेही ते म्हणाले. मंत्री उदय सामंत आपली जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? तुमच्या पक्षाचा रोज एक मंत्री अडचणीत येत आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, पदे खाली वर होतात, मात्र आमचा अजेंडा एकच आहे. तो म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणणे, राज्याचा विकास करणे. आमचा अजेंडा हा खुर्ची नाही तर ज्या जनतेने आम्हाला खुर्चीवर बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आहे.
जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे हे आमचे काम आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत, याकरिता आम्ही प्रत्येकजण काम करत आहोत. वारकरी महामंडळाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वारकरी महामंडळाचे जे जे काही राहिले आहे, ते लवकरच पूर्ण करणार आहे. वारकरी दिंड्यांना, पालख्यांना आपण अनुदान दिले आहे. या महामंडळामार्फत वारकर्यांच्या गरजांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे.