करकंब : चीनमधील निकृष्ट दर्जाचा बेदाणा राज्यात विक्री होत असल्याचे समोर आल्याने उत्पादक धास्तावले आहेत. त्यामुळे चिनी बेदाणा विक्री करणाऱ््या अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत. संबंधित कोल्ड स्टोअरेज चौकशी होईपर्यंत सील करावे. त्यांच्यावर आठ दिवसात कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बेदाणा उत्पादक शेतकरी आंदोलन करणार असल्याची मागणी करकंब येथील शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती यांच्याकडे केली.
मागील दोन वर्षे प्रतिकूल स्थितीमुळे भारतात द्राक्ष उत्पादन कमी होत आहे. यंदाही कमी प्रमाणात द्राक्षे येणार आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. उत्पादन घटल्यामुळे बेदाण्याचे दर वाढले आहेत. वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी अफगाणिस्तानातून चीनचा निकृष्ट बेदाणा छुप्या पध्दतीने भारतात आयात करण्यात आला आहे.
बेदाण्याचे भाव जून-जुलै 2025 मध्ये रु.650 ते 700 पर्यंत वाढले होते. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामुळे अटारी बॉर्डर बंद असल्यामुळे रेट वाढले होते. त्याच्यानंतर बेदाणा आयात झालेली बातमी बाजारात आल्यामुळे बेदाण्याचे दर रु.300 पर्यंत खाली आले. दीपावलीनंतर अफगाणच्या नावाखाली चीनचा बेदाणा आवक झाला. स्थानिक बेदाणा थोडा शिल्लक असताना गेले दोन महिने दर रु. 300 ते 350 राहिले आहेत. व्यापारी चर्चेतून 5 हजार टन चीनचा बेदाणा आवक झाला आहे. यापूर्वी द्राक्ष बागायतदार संघाने चीनचा बेदाणा नेपाळमार्गे बेकायदेशीर आयातीच्या विरोधात आंदोलन करून बंदीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्ह्यात आयात माल विकी न करण्याचा निर्णय झाला होता. अफनाणी बेदाणा (रेसिड्यू फ्री) अवशेषमुक्त तपासणी करण्यात आलेला नाही. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. आयात केलेला बेदाणा निकृष्ट दर्जाचा आहे. तो तपासणी करुन हानिकारक नाही, याची खात्री होईतोपर्यंत बाजारात विक्री करू नये.
नवीन हंगाम सुरू होणार आहे. फेबु्रवारीच्या 20 तारखेपर्यंत चालू होते. बाहेरील निकृष्ट बेदाणा आयात करुन जास्त माल आहे, असे दाखवून स्टॉक करून ठेवण्याचा व्यापाऱ्याचा डाव आहे. चालुवर्षी उत्पादन कमी असताना बेदाणा आयातीमुळे दर कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. आधीच उत्पादन कमी असताना तसेच महाराष्ट्रातील बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाचे दरसुध्दा कमी राहण्याची चिंता आहे. यामुळे द्राक्ष शेती व बेदाणा उत्पादक उद्ध्वस्त होणार आहे.
दरम्यान, एकीकडे आधीच द्राक्षशेती संकटात आली असताना त्यात सांगली जिल्ह्याचे द्राक्ष आणि बेदाणा या क्षेत्रात देशभर चांगले नाव आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून नफाखोरीसाठी अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचा बेदाणा पंढरपूरचा म्हणून जर विकी करण्यात आला तर देशभर पंढरपूरचा बेदाणा खराब असल्याची बदनामी होण्याचा भीती आहे.