सोलापूर : दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाचे धागेदोरे शोधत केंद्रीय गुप्तचर खात्याची यंत्रणा थेट सोलापुरात येऊन धडकली. दहशतवाद्यांच्या दृष्टीने सोईचे ठिकाण ठरू पाहणाऱ्या सोलापूरमध्ये पथकाने केलेली कामगिरी गोपनीय ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या काही दिवस अगोदर मूळचा सोलापुरातील आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर याला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्या साथीदारांची केंद्रीय गुप्तचर पथकाने चौकशी केल्याचे वृत्त आहे. मात्र, यास अधिकृत यंत्रणांनी दुजोरा दिला नाही.
जुबेर हा एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. कुंभारी हद्दीतील एका शाळेत त्याने व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा घेतली. त्यानंतर तो चेन्नईत गेला. तेथून परतल्यावर एटीएसने त्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्यानंतर दिल्लीतील स्फोटाचे जुबेरशी कनेक्शन आहे का, याचा तपास करण्यासाठी पुणे एटीएसचे पथक सोलापुरात येऊन गेले. त्याचवेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे पथकही सोलापुरात येऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.