सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामकाजाचे पदभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे आहे. मात्र, बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मुख्यालयातील साफसफाईचे टेंडर काढल्याचे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दखल घेत साफसफाईचे टेंडर रद्द केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विविध कामे करण्याचा पदभार बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता खराडे यांच्याकडे होता. मात्र, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तो पदभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याकडे दिला. तेव्हापासून मुख्यालयातील कामे कुलकर्णी पाहत आहेत. मात्र, बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता खराडे हे अधूनमधून मुख्यालयातील विविध कामे मंजूर करत असल्याची माहिती समोर आली होती.
पदभार कुलकर्णींकडे असताना कामे खराडे मंजूर करत असल्याने दोन्ही अभियंत्यांमध्ये सातत्याने वाद होत होते. याविषयी दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची दखल घेण्यात आली असून, आता मुख्यालयातील कामकाज भार दोन्ही अभियंतांना वगळून तिसऱ्या अभियंत्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमधील वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपाध्यक्षांनी काढला तोडगा
मुख्यालयातील कामांवरुन बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता खराडे आणि दोनचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्यात सातत्याने वाद होत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेची विनाकारण बदनामी होत असल्याने उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषद मुख्यालय, यशवंतनगर, उत्तर आणि दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील साफसफाईसह इतर अनेक कामे करण्याचा अधिकार आता तिसऱ्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
तीस लाखांचे होते टेंडर
जिल्हा परिषद मुख्यालय इमारत, दक्षिण व उत्तर पंचायत समिती आणि यशवंत नगर येथील पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या घरांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी तीस लाख रुपयांचे टेंडर बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता खराडे यांनी काढले होते. ते रद्द करण्यात आले असून, तेच टेंडर आता बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी मंजुरी देणार आहेत.