सोलापूर : महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एमबीए अभ्यासक्रमाची सर्वाधिक मागणी होती. आता या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा एमबीए अभ्यासक्रमाच्या तब्बल 10 हजार 867 जागा रिक्त राहिल्या आहेत. यावर्षी एमबीए प्रवेश प्रक्रियेसाठी 71 हजार 245 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, परंतु प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ 42 हजार 642 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत.
या आकडेवारीवरून नोंदणीच्या तुलनेत प्रवेश निश्चित करण्यार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली. एमबीए अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची वाढती उदासीनता हे शिक्षण क्षेत्रासाठी नवीन आव्हान ठरले आहे.
यामुळे संस्थाचालकांना धक्का बसला असून या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांच्या नोकरीची हमी राहिली नसल्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका प्राध्यापकाने ‘पुढारी’स सांगितले. करिअरच्या संधी, शिक्षण शुल्क आणि उपलब्ध जागांची संख्या यांसारख्या अनेक घटकांमुळे विद्यार्थ्यांच्या पसंतीमध्ये बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
घटत्या प्रवेशाची आकडेवारी
महाराष्ट्रात एमबीए अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहण्याचा दरवर्षी नवा उच्चांक होत आहे. गतवर्षी 8 हजार 321 जागा रिक्त होत्या तर 42 हजार 176 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. यंदा 10 हजार 867 हून अधिक जागा रिक्त राहिल्या तर 42 हजार 642 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
गुंतागुंतीची प्रवेश प्रक्रिया
यंदाची एमबीए प्रवेश प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची झाली. वेळापत्रकात अचानक बदल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी यामुळे वेळेवर अर्ज करू शकले नाहीत. एमबीए प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे.