बार्शी : घरात कोणी नसल्याचे संधी साधून चोरट्यांनी भर दिवसा घराचे तीन ठिकाणी असलेले कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा सहा लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील अलीपूर येथील गुंड प्लॉटमध्ये घडली.
प्रशांत शहाजी गुंड (रा. गुडं प्लॉट, अलीपूर) यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कुटुंबीयांसह राहण्यास असून पती पत्नी नौकरी करतात.घटनेदिवशी मुलगी सकाळी सकाळी शिकवणीसाठी बार्शीला गेली होती. पत्नी राणी ही नोकरी करीता गेली होती. मुलगा शाळेत गेला होता. फिर्यादी प्रशांत गुंड वैराग येथे कामाला गेले होते.
त्यांनी नोकरी करीता जाताना घराच्या हॉलच्या दरवाजा, सेफ्टी डोअर, घराच्या बाहेरील गेटला असे तीन ठिकाणी कुलूप लावली होती. कामावरुन घरी आल्यावर घराचे सेफ्टी डोअर व लाकडी दरवाजाचे कुलुप तोडल्याचे दिसले. हॉलमधील लोखंडी शोकेसमधील कपडे बाहेर काढुन अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटलेला व आतील ड्रॉवर उचकटुन बाहेर फरशीवर टाकलेल्याचे दिसून आले. ड्राव्हरमध्ये दागीन्याची डब्बी रिकामी पडली होती. चोरट्यने त्यातील सर्व दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले.