सोलापूर : आज 21 जूनपासून दक्षिणायन सुरू झाले आहे, यामुळे सोलापूरसह उत्तर गोलार्धात दिवस लहान आणि रात्री मोठ्या होतील. या बदलामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता हंगामाची तयारी सुरू करतात. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी पाणी व्यवस्थापन, जमिनीची मशागत केली जाईल.
दक्षिणायनाच्या काळात थंडीचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, तर निसर्गात पक्ष्यांचे स्थलांतर आणि झाडांची पानगळ दिसून येईल. शेती, पर्यावरण आणि आरोग्यासाठी या बदलांविषयी जागरूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
दक्षिणायनादरम्यान सोलापुरात निसर्गातही महत्त्वपूर्ण बदल दिसून येतात. मुख्य म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर सुरू होते, झाडाझुडुपांमध्ये पानगळ होते. मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, दिवस लहान आणि रात्री मोठ्या झाल्याने थंडीचा प्रभाव अधिक जाणवतो. संधिवात, सर्दी, ताप असे आजार वाढू शकतात. मात्र, हा काळ विश्रांतीसाठी आणि पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य ठरतो, ज्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते
सोलापूरच्या शेतीप्रधान भागासाठी दक्षिणायन काळ फार महत्त्वाचा मानला जातो. या काळात खरीप हंगामातील पिके कापणीस येतात. त्याचवेळी शेतकरी रब्बी हंगामासाठी लगबग सुरू करतात. यामध्ये बियाणे निवडणे, पाणी व्यवस्थापनाची आखणी करणे आणि जमिनीची मशागत करणे यांसारख्या तयारीला सुरुवात होते.
सोलापूरसारख्या शेतीप्रधान जिल्ह्यासाठी दक्षिणायन हा फक्त एक खगोलशास्त्रीय बदल नाही, तर शेती, आरोग्य आणि निसर्गाच्या साखळीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या काळातील बदलांविषयी जागरूकता आणि शास्त्रीय माहितीच्या आधारे आपण याचा अधिक प्रभावीपणे उपयोग करू शकतो.- प्रा. डॉ. विनायक धुळप