सोलापूर : 15 जानेवारीला तुम्ही कमळाची काळजी घ्या, 16 तारखेपासून पाच वर्षे देवाभाऊ तुमची काळजी घेणार असल्याचे सांगत सोलापूरकरांना दररोज स्वच्छ पाणीपुरवठा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पांढऱ्याशुभ्र बारबंदी पोशाखात व्यासपीठावर येत विकासाच्या मुद्द्यांना हात घालत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांची मने जिंकली.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकींमधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 10) हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्याला हात घातला.
उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्यात शहरातील दररोजच्या पाणीपुरवठ्यासाठी 850 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचे टेंडरही निघाले आहे. सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज स्वच्छ पाणी आणल्याशिवाय थांबणार नाही, असे सांगत 2057 ची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी आताच आणणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यासाठी नाशिक ते अक्कलकोट हा महामार्ग नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. देशातील सर्वात मोठा आणि जगातील दहाव्या क्रमांकाच्या वाढवण बंदराशी जोडणारा हा महामार्ग आहे. या रस्त्याच्या माध्यमातून सोलापूर हे वाढवण बंदर आणि मुंबई-दिल्ली महामार्गाशी जोडले जाणार आहोत. रस्त्यांचे जाळे विणल्याने विकासाचा राजमार्ग मोठा होत असल्याचेही ते म्हणाले.
सोलापूरची ओळख डाळिंबाची राजधानी अलीकडेच झाली आहे. सोलापूरची चादर, शेंगाचटणी, हुरडा ही सगळी ओळख याच सोलापूर शहराने मिळवून दिलेली आहे. आत आधुनिक शहराची ओळख आपल्याला मिळवून द्यायची आहे. विमानसेवा सुरु झाली असून आगामी काळात सोलापुरातून नाईट लँडिंग सुरु करण्याचा आमचा मानस आहे. तसेच इतर शहरातही विमानसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर हे पर्यटनाचे सर्किट करण्यात आले आहे. पर्यटनाचे इंजिन म्हणून सोलापूरला विकसित करणार आहेत. गरिबांना घरे मिळावीत म्हणून आवास योजना सुरू केली आहे. सोलापूर पंतप्रधान आवास योजना हे सर्वात मोठे उदाहरण आहे. झोपड्पट्टीमधील लोकांना आपण घरे देत आहोत. घराकरिता अतिक्रमणधारकांना जमिनीचा मालकी हाक देणार आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शहरासाठी 100 ई बसेस दिल्या आहेत, त्याच्या चार्जिंग स्टेशनचे काम महिनाभरात पूर्ण होईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तरुणांच्या मागणीचा विचार करून आयटी पार्कसुद्धा गती घेणार असून यंत्रमाग उद्योगाला सवलती देऊन त्याला उभारी देण्यासाठी सोलापुरात इचलकरंजी पॅटर्न राबविणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे,भाजप शहाराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण, चेतनसिंह केदार यांच्यासह भाजपचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.