सोलापूर

राज्यातील सध्याचे राजकारण हे गलिच्छ : छत्रपती संभाजी राजे

backup backup

सांगोला : पुढारी वृत्तसेवा गेल्या ७५ वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे कधीच पाहिले नाही. जे विरोधात होते तेच आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसल्यामुळे राजकारणाची जणू काय थट्टा चालवली आहे. त्यामुळे आगामी २०२४ ला स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेगळा पर्याय उभा केल्याचे मत स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी सांगोल्यात व्यक्त केले.

स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी रविवारी सांगोला तालुक्याच्या एकदिवसीय दौऱ्यात तालुक्यातील १५ गावात स्वराज्य पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करुन थेट जनतेशी संवाद साधला.त्यांनीअजनाळे येथील डाळिंब बागेत प्रत्यक्ष जाऊन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, चिंचोली कोरडा तलाव, माण व कोरडा नदीची पाहणी केली , जनावरांच्या बाजारात भेट देऊन शेतकरी पशुपालकांना बाजार समितीकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा बद्दल नाराजी व्यक्त केली ,चारा छावणी चालकांच्या आंदोलन स्थळी भेट प्रलंबित बिल मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली तसेच रेल्वेच्या माल धक्क्यासह तालुक्यातील खड्डेमय रस्त्याची पाहणी करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका केली.

त्यानंतर सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्य पक्षाच्या जाहीर सभेस छत्रपती संभाजी राजे यांनी संबोधित केले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच सोलापूर जिल्हा व सांगोला तालुका संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील, महेश नलावडे, अरविंद केदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली संधी लक्षात घेऊन स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती होती त्यांचं जुळलं नाही म्हणून त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत आणि विरोधात देखील असताना मजा मात्र भाजप घेतय अशी टीका करून सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली सांगोल्यातील प्रश्नावर बोलताना त्यांनी डाळिंबा निर्यातीसाठी किसान रेल्वे बंद आहे, एमआयडीसी नाही, रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत,झाली नसतील तर चला दाखवून देतो म्हणून थेट चॅलेंज दिले. डाळिंब , द्राक्षे संशोधन केंद्र नाही येथील खासदार, आमदार यांना तुम्ही प्रश्न विचारात का ? असा सवाल उपस्थित केला.यापुढे जो तुमचे काम करेल, जो तुमच्या भागाचा विकास करेल त्यासाठी जातीच्या पलीकडे जाऊन त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वराज्य पक्ष जिल्हाप्रमुख महादेव तळेकर, संपर्कप्रमुख करण रायकर, सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अरविंद केदार यांनी केले. या सभेस सांगोला तालुक्यातील स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT