पंढरपूर : शनिवार, रविवार विकेंडच्या सलग दोन सुट्ट्या आल्या. तर सोमवारी दिवाळी नरक चतुर्थी, मंगळवारी लक्ष्मी पूजन, बुधवारी दिवाळी पाडवा, गुरुवारी भाऊबीज आहे. यामुळे सलग आठवडाभर शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. या सुट्टीत लाखो भाविक आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागातीरावरील सारडा भवनच्या पुढे विप्रदत्त घाटापर्यंत पोहोचली आहे. आणखी रांगे पुढे सरकत चालली आहे. मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविक मनोमन सुखावले जात आहेत.
दिवाळी सणानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेले भाविक हे चंद्रभागा स्नानासाठी गर्दी करत आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून पिण्याचे शुध्द पाणी, वॉटरफ्रुफ दर्शन शेड उभारुन सेवा देण्यात आलेली आहे. मात्र काही ठिकाणी मॅटच टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे भाविकांंना धूळ व खडी तुडवत वाट काढावी लागत आहे. शनिवार व रविवार विकेंड असल्याने सलग दोन दिवस सुट्टी आली. तर दिवाळीनिमित्त सलग चार दिवस सुट्टी मिळालेली आहे.
यामुळे राज्यभरातील व परराज्यातूनही हजारो भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. भाविकांच्या वाहनांची देखील पार्किंग हाऊसफुल्ल झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेले भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यास प्राधान्य देत आहेत. मुख दर्शन, कळस दर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेवून भाविक धन्यता मानत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत असल्याने बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. दिवाळीनिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांना मनोमन सुखावत आहे.