करमाळा : अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांविरुद्ध करमाळा पोलिसांनी जोरदार कारवाई केली. त्यांच्याकडून 4 लाख 90 हजार रुपये किमतीची 19 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, तिघा इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई 16 मे रोजी करण्यात आली.
सुहास ऊर्फ सिद्धू भारत तावसे, राजेश महेंद्र रोकडे व आनंद सुखदेव सातव, (सर्व रा. वांगी नं. 3, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मौजे वांगी नं. 3 येथे चोरून वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी एक पोलिस पथक तयार करून सापळा रचला.
उजनी जलाशयाच्या नदीपात्रात पोलिस आल्याची चाहूल लागताच सुहास ऊर्फ सिद्धू भारत तावसे व राजेश महेंद्र रोकडे हे वाळूने भरलेला टेम्पो घेऊन तेथून पळून गेले. त्याचा पाठलाग करीत उजनी जलाशयाकडे जात असताना समोरून येत असलेल्या अन्य एका टेम्पोस पोलिसांनी गाडी आडवी लावून तपासणी केली. चालक आनंद सुखदेव सातव, रा. वांगी नं. 3, ता. करमाळा हा टेम्पो जागीच सोडून तेथून पळून गेला. सदर टेम्पोमध्ये 1 ब्रास वाळू मिळून आली.
यावेळी नदीकाठी पाहणी केली असता, उजनी जलाशयाच्या कडेला वाळूचा उपसा करून ढिगारा घातल्याचे दिसून आले. त्याबाबत वाळूचा पंचनामा करून करमाळा पोलिस ठाणे येथे पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील , वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने, पो.ना. प्रमोद गवळी, मनीष पवार, वैभव टेंगल, सोमनाथ जगताप, अर्जुन गोसावी, रविराज गटकुळ, ज्ञानेश्वर घोंगडे, विलास आलदर, राहुल माने आदिच्या पथकाने ही कामगिरी बजावली.