Construction workers Pudhari News Network
सोलापूर

Construction workers: बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे 3 कोटी 62 लाखांचे विद्यावेतन लाटले

20 जणांवर गुन्हा; सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे तिघे निलंबित

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे बांधकाम कामगारांची मुले अन्य राज्यांत उच्च शिक्षण घेत असल्याचे दाखवत विविध बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे सोलापुरातील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी व एजंटांनी मिळून तीन कोटी 62 लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. अपहारप्रकरणी 20 जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघाना निलंबित केले आहे.

नियमित कर्मचारी संतोषसिंग राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी, अजिंक्य पवार तसेच आकाश कोळी, समिर पटेल, अन्नपुर्णा पंडकी, तब्बसुम यादगिरी, अर्जुन संगा, रविराज मुसळे, अंबादास बुगडे, भारत करंडे, सूरज मगर, रविकांत पाटील, शिवानंद सुरवसे, आशितोष कटारे, अर्चना पाटील, शीतल परदेशी, सौरभ हलके, बाळासाहेब शिंदे, चंदन दिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील संतोषसिंग राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी व अजिंक्य पवार या तिघांना निलंबित केले आहे.

याबाबत माहिती अशी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांंच्या पाल्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन ही योजना राबवली जाते. या माध्यमातून या कामगारांच्या मुलांना उच्च्शिक्षणासाठी दरवर्षी प्रति लाभार्थी 60 हजार रुपयांचे विद्यावेतन मिळते. लाखाहून जास्त बांधकाम कामगारांची जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. सहा महिन्यापूर्वी 223 लाभार्थ्यांनी आपल्या मुलांच्या नावे इतरांनी विद्यावेतनाची रक्कम उचलल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही.

ही विद्यावेतनाची रक्कम बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कामगार कार्ड तयार करुन तसेच बनावट शैक्षणिक कागदपत्रांची कार्यालयाकडे पूर्तता करून त्या आधारे उचलण्यात आली होती. यात शासनाची आठ कोटीहून अधिक रक्कमेचा अपहार झाल्याचा तारांकित प्रश्न आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. तर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच सह कामगार आयुक्तांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी केली व त्यांच्यावर 3 कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याने यांना निलंबितही केली. दरम्यान, अपहाराची रक्कम 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या चौकशीत संबंधित लाभार्थ्यांच्या नावांची यादी व त्यांचे पाल्य ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत त्याही संस्थांची पडताळणी केली जाणार आहे.

दीड महिन्यापूर्वी येथील प्रभारीचा पदभार घेतला आहे. पदभार घेण्यापूर्वीच येथे अपहार झाला आहे. कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारीवरून चौकशी केली. यात तीन कोटी 62 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्यानेच जबाबदार तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याची सखोल चौकशी होईलच. कामगारांनी कोणत्याही कामासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. तसे कोणाबाबत घडल्यास कार्यालयात थेट तक्रार करावी.
-मंगेश झोले, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT