सोलापूर : फडणवीस सरकार मराठा समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी आज सोलापूर येथे केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा आपला उद्देश कधीच नव्हता. राजकारणापेक्षा मराठ्यांचे कल्याण आणि गरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण व ऐतिहासिक भित्तीशिल्पाचे उदघाटन जरांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या आरक्षण धोरणावर जोरदार टीका केली.
शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सरकारने या नोंदी तसेच सातारा-कोल्हापूर संस्थानांचे गॅझेट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. २१९ प्रमाणपत्रे अवैध ठरल्याच्या दाव्यावरही त्यांनी टीका करत हा मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले. मराठ्यांनी ओबीसींचे एकही प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केलेली नाही. केवळ मराठा मुलांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, एवढीच भूमिका आहे.
मराठ्यांना प्रमाणपत्रे आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आगामी निवडणुकीत मराठा समाज सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. २९ ऑगस्टला मोठ्या संख्येने एकत्र येऊन मराठा समाजाने आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.
शिवरत्न नाव बदलाबाबत भूमिका घेणार
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या निर्णयाबाबत शासन निर्णय (जीआर) समजून घेऊन भूमिका मांडणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. बार्शीतील एका महिलेने बेकायदेशीररीत्या ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणाचीही माहिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही गुण्यागोविंदाने नांदू नये का?
सोलापुरात मराठा समाजाचा महापौर असावा, अशी मागणी करण्याचा अधिकार समाजाला आहे. मात्र, त्यावरून इतर समाजाशी वैर करण्याचे कारण नाही. आम्ही गुण्यागोविंदाने नांदू नये का? असा उलट सवाल करत महापौरांच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मागणी करणारेच आता महापौरांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.