सोलापूर ः जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बूथनिहाय मतदार यादीची पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 37 लाख 63 हजार मतदार यादीची पुनर्पडताळणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ केल्याचा दावा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला. यात मतदार यादीतील अनेक घोटाळे पुढे आणले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बूथनिहाय मतदार यादीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात पंढरपूर आणि सांगोला येथून करण्यात आली आहे. सातलिंग शटगार यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा दौर्याला सुरुवात केली आहे. मतदार यादीत दुबार मतदान, मतदार यादीतून वगळलेली नावे, मृत्यू झालेल्या मतदारांचे नावे कमी केली आहे का, अशा विविध गोष्टींची तपासणी, पडताळणी करावी, असे आदेश पंढरपूर, सांगोला येथील बैठकीत दिले होते. त्यानुसार तालुका, गावपातळीवरील नेते, कार्यकर्ते बूथनिहाय मतदार यादीची पुनर्तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
मतचोरी करून भाजपाचे सत्ता कशी आणली आहे, हे राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी दाखविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा धोका पुन्हा होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व गावातील मतदार याद्यांची बूथनिहाय पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.सातलिंग शटगार, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस