सोलापूर : लोकशाही आणि मतदानाचा अधिकार वाचविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि.१) दिल्लीत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. व्होट बचाव, देश बचाव या अभियानांतर्गत होणाऱ्या या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक दिनेश कोडानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाही संपविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कोडनिया यांनी केला. या विरोधात २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत काँग्रेसतर्फे ‘व्होट बचाव, देश बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून दिल्लीत होणाऱ्या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
न्यायपालिका आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करीत असल्याचा आरोप करत, देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप कोडनिया यांनी केला. नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहावेत आणि या गंभीर प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधले जावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेसचे सोलापूर पश्चिमचे अध्यक्ष संदीप साठे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे आणि तिरुपती परकीपंडला उपस्थित होते.