मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉरिडॉर बाधितांची भेट घ्यावी 
सोलापूर

Pandharpur Corridor : मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉरिडॉर बाधितांची भेट घ्यावी

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची मागणी; मुख्यमंत्री पंढरपुरात येत आहेत तर भेट द्यावी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प राबविला जाईल, असे सांगत आहेत. परंतु ते स्वतः कॉरिडॉर बाधितांना भेटण्यास तयार नाहीत. आषाढी यात्रा एकादशीला प्रशासनाकडे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. परंतु मिळाली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर राबविणार्‍या मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉर बाधितांची भेट घ्यावी आणि विश्वास द्यावा, अशी मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने केली आहे.

पंढरपूर कॉरिडॉर संभाव्य बाधितांशी शासनामार्फत जिल्हाधिकारी यांनी गटागटाने चर्चा केलेली आहे. बाधितांना मोबदला देण्याबाबत प्रशासनाकडून तीन अधिकार्‍यांमार्फत गटागटाने चर्चा करण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारी बाधितांशी चर्चा करतात. मात्र, मुख्यमंत्री बाधितांशी चर्चा करत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस हे अनेक लोकांना भेटतात. मात्र, कॉरिडार बाधितांना भेटत नाहीत, हे योग्य नाही. केवळ विश्वासात घेऊ असे सांगितले जात आहे. परंतु, भेट दिली जात नाही. उद्याच्या 23 जुलैला श्री संत नामदेव 675 समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरला येणार आहेत. नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहेत. त्यावेळेला त्यांनी कॉरिडॉर बाधितांची भेट घ्यावी. कॉरिडॉर बाधितांच्या व्यथा, वेदना जाणून घ्याव्यात. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आम्ही बाधितमंडळी नामदेव पायरीपासून एक मिनिटाच्या अंतरावर हिंदू महासभा भवन याठिकाणी जमणार आहोत. तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉरिडॉर बाधितांना भेटून विश्वासात घ्यावे. आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने केली आहे. याप्रसंगी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर, सचिव अ‍ॅड. उंडाळे, उपाध्यक्ष गुरव महाराज, उत्पात महाराज, हरिदास महाराज यांच्यासह संभाव्य बाधित दुकानदार, घरमालक, आस्थापनाधारक उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे बाधितांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचे काम करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, संभाव्य बाधितांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉर बाधितांची भेट घ्यावी. कॉरिडॉर बाधितांच्या व्यथा, वेदना जाणून घ्याव्यात. आम्हाला विश्वास द्यावा.
अभयसिंह इचगांवकर, अध्यक्ष, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT