सोलापूर : मतदारयादीतील दुबार नावे ही आजची आहेत, मतदारयादीचे शुद्धीकरण झाले पाहिजे. परंतु, विरोधक कायदा समजून न घेता, संविधानाचा सन्मान न ठेवता नरेटिव्ह सेट करतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
दुबार मतदान आणि मतदारयादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा विरोधकांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र, कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे करायची हे त्यांना माहिती नाही, कायदा काय आहे हे माहिती नाही, कोणत्या निवडणुका कोणत्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालतात, याची माहिती नसलेले हे विरोधक असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
विरोधक हे राज्याचे निवडणूक अधिकारी असलेल्या चोक्कलिंगम यांच्याकडे गेले होते. चोक्कलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. मतदारयादी अंतिम करण्यापूर्वी हरकती मागविल्या जातात, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी जायला पाहिजे होते. तेव्हाच तक्रार करायला हवी होती. मात्र, तेव्हा तक्रार, हरकत न घेता आता काही तरी नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांकडून मतदारयाद्यांत घोळ असल्याचे पुढे केले जात असल्याची टीका फडणवीस यांनी केली.