सोलापूर : निवडणूक म्हटले की विरोधकांवर टीका टिप्पणी आलीच; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.10) सोलापुरात झालेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व दिले. दररोज पाणी, विमानसेवा, ई बसेस, आयटी पार्क आदींवर बोलत सोलापूरकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. यामुळे सभेचा नूरच पालटून गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाराबंदीत सभास्थळी आल्यानंतर एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्री फडणवीस हे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आपल्या अर्धा तासाच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ आणि केवळ सोलापूरच्या विकासाचे मुद्दे मांडले. विरोधकांचा ओझरता उल्लेख करीत त्यांना महत्व देण्याचे टाळले. सोलापूरचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणीपुरवठा, चारदिवसाआड पाणी भरणाऱ्या सोलापुरातील भगिनींना दररोज पाणी देण्याचा शब्द फडणवीसांनी देऊन एकप्रकारे त्यांना आश्वस्त केले. दुसरीकडे विमानसेवा सुरु झाली असली तरी नाईट लँण्डींग, सोलापूर ते तिरुपती आणि बंगळुरु विमानसेवा सुरु करण्याची घोषणा करुन विकासाची दारे अजून खुली होत असल्याचे संकेत दिले.
सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच काम देण्यासाठी आयटी उद्योगाची उभारणी सुरु आहे. जागा निश्चित झाली असून लवकरच आय टी कंपन्या सोलापुरात उभ्या राहणार असल्याचे ते म्हणाले. याच बरोबर शहरातील अक्कलकोट रोड व होटगी रोड एमआयडीसीतील सुविधांच्या पूर्ततेसाठी भाजपा प्रयत्नशील असून इचलकरंजी प्रमाणे सोलापुरातील यंत्रमाग उद्योगांना सुविधा देण्याचा घोषणा त्यांनी केली.
सोलापूरची ओळख चादर, कडक भाकरी, हुरडा, शेंगा चटणी जशी आहे त्याचसोबत सोलापूरला आधुनिक शहराची ओळख मिळवून देण्याचे आमचे स्वप्न आहे. सोलापूरसाठी नाशिक - सोलापूर - अक्कलकोट असा महामार्ग मंजूर केला आहे. हा रस्ता देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या वाढवण बंदराला जोडत असल्यामुळे या परिसरात औद्योगिकरणाकरता नवी इकोसिस्टीम तयार होणार आहे. तसेच हा रस्ता मुंबई - दिल्ली महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गती वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे सोलापूर हे भविष्यात पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले.
सोलापूरकरांच्या या महत्वाच्या प्रश्नांना हात घालत त्यांनी उपस्थित जनतेची मने जिंकली. विरोधकांची टीका महत्वाची नसून विकासाचे मुद्दे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवून दिले. यामुळे संपूर्ण सभेचा नूर पालटल्याचे दिसून आले.