पंढरपूर : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही, अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला आहे. देशातील ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, आ. राजेंद्र राऊत, आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. विजयकुमार देशमुख, आ. उत्तमराव जानकर, आ. नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड आदी उपस्थित होते.
कर्जमाफीची भव्य सुरुवात करण्याऐवजी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी, या उद्देशाने आज येथून कर्जमाफीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत. यापुढे जसजशी बँकाकडून माहिती जमा होईल, तसतशा पुढील याद्या जाहीर करून कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येईल.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेतून मागे राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. २०१५-१६ साली स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या प्रदर्शनाची सुरुवात केली. पंढरपूरला येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत शेतीच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग पोहोचले पाहिजेत, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली.
राज्यातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये गणना होत असलेली ही बाजार समिती अतिशय उत्तम कारभार करत असून १६ कोटींपासून प्रचंड मोठी भरारी घेत समितीने मोठा विस्तार केलेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाजार समितीचा गौरव केला. यावेळी प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख करत कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.