सोलापूर : चेन्नईच्या कंपनीसोबत मोलॅसिस देण्याचा करार करून ॲडव्हान्स म्हणून 15 कोटी 72 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या संचालकांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ शुगरचे डायरेक्टर गणपत दत्ता शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर दत्ता बलभीम शिंदे, डायरेक्टर विशाल गणपत शिंदे, सी.एफ.ओ. कपिल बलभीम शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखला आहे. गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने चेन्नई येथील ई.आय.डी.पॅरी इंडिया लि. या कंपनीसोबत बी हेवी मोलॅसिस व सी हेवी मोलॅसिस देण्याचा करार केला. सप्टेंबर 2024 मध्ये नवी पेठेतील युवा गारमेंट शोरूम येथे हा व्यवहार झाला. त्यानुसार कंपनीकडून ॲडव्हान्स म्हणून बी हेवी मोलॅसिससाठी नऊ कोटी 20 लाख रुपये आणि सी हेवी मोलॅसिससाठी सहा कोटी 52 लाख 50 हजार रुपये असे एकूण 15 कोटी 72 लाख 50 हजार रुपयेे ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेतील कारखान्याच्या अकाऊंटवर आरटीजीएसने घेतले.
संशयित आरोपींपैकी एकाच्या पत्नीच्या खात्यावर तसेच युवा गारमेंट दुकानाच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग करून घेतली. कारखाना सक्षम असल्याचा आभास निर्माण करून कंपनीची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे राजगोपालन श्रीनिवासन रामस्वामी (रा. रामनाथ नगर, कांचीपुरम, तामिळनाडू) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.