सोलापूर : गौण खनिज अंतर्गत सर्व संबंधित अधिकार्यांनी दंड व फौजदारी कारवाई एकत्रितपणे केली पाहिजे. तरच वाळू चोरावर वचक बसेल. दंड वसूल करण्याऐवजी फौजदारी कारवाई करून उत्खनन चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रशासनाने 413 लोकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे, त्याऐवजी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
गुरुवारी (दि. 29) नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीवेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, दिनेश पारगे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार, प्रांताधिकार्यांनी अर्धन्यायिक प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. जास्तीत जास्त दोन तारखा देऊन प्रकरणे मेरिटवर निकाली निघतील यासाठी प्रयत्न करावेत. महसूल विभागातील अधिनियम, कायदे आजच्या काळानुसार नसतील व त्यात काही ठिकाणी बदल आवश्यक असतील तर तसे अभ्यासपूर्ण बदल करण्याबाबतचे प्रस्ताव महसूल विभागाला द्यावेत. त्यात बदल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये गौण खनिज वसुली 97 कोटी झाल्याचे सांगून नवीन शासन निर्णयाप्रमाणे नवीन वाळूधोरणानुसार जिल्ह्यात नऊ वाळू गटाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक स्वरूपात पाच घरकूल लाभार्थ्यांना नवीन वाळू धोरणानुसार मोफत वाळू घेऊन जाण्यासाठी रॉयल्टी प्रमाणपत्र वाटप केले.
भाजपच्या शहर-जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी (दि. 29) सायंकाळी झाली. या बैठकीत वेळेअभावी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 15 मिनिटे वेळ देऊन उपस्थित सदस्यांकडून निवेदन स्वीकारत मार्गदर्शनसाठी पुन्हा येणार असल्याचे सांगून तेे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सोलापुरात दिवसभर मॅरेथॉन बैठका आणि विविध कार्यक्रम होते. नुकतेच सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर, पूर्व सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शशिकांत चव्हाण, पश्चिम सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार-सावंत यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीस माजी आ. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रोहिणी तडवळकर, चेतनसिंह सावंत, शशिकांत चव्हाण, नागेश सरगम उपस्थित होते.
पाणंद रस्त्यासाठी नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबवावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 12 फूट रुंद व एक किलोमीटर लांब रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी देण्यात येतो. यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त रस्त्यांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या.