पंढरपूर : वीर व उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरत आले आहे. तर वीर धरणही शंभर टक्के भरु लागले आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विगर्स सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोमवारी सायंकाळी ३० हजार क्युसेक तर वीरमधून नीरा नदीत ५६८२ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी संगम येथे एकत्रित येत असून पुढे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत येत आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वीर धरणातून दि.२७ रोजी पहाटे ५ वाजता धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून ४५८२ क्युसेक व अतिवाहकाद्वारे ११०० क्युसेक असा एकूण ५६८२ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे नीरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे.
तर उजनी धरणात सद्यस्थितीत स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ८.३० वाजता ३० हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी केले आहे.
दरम्यान माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना मात्र, भीमा (चंद्रभागेला) धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उजनीचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने चंद्रभागेचा दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.