सोलापूर : शहरातील एमआयडीसी परिसरात कापड कारखान्यात बांगला देशींना अटक केल्यानंतर पुन्हा कारवाईस वेग आला आहे. घुसखोर बांगला देशींविरोधात राज्य शासनाने कारवाईचे पाऊल उचलले असून, पोलिसही त्याकामी लागले आहेत. परंतु, त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे. झोपड्यांमध्ये, बांधकामाच्या ठिकाणी राहणार्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत? हे केवळ त्यांच्या बोली भाषेवरून स्पष्ट होत नसल्याने, पोलिसांना त्यांची कागदपत्रे पाहून त्यांना ओळखणे खाकीसमोर आव्हान असणार आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरीसाठी चाकू हल्ला करणार्या बांगलादेशी नागरिकाला ठाण्यात अटक केली. त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा बांगलादेशींवर कारवाईला वेग आला. त्यातूनच सोलापुरात गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून कारखान्यात काम करणार्या बारा बांगलादेशी गळाला लागले. बांगला देशी हे त्यांचा देश सोडून भारतात येतात. याठिकाणी येऊन आपली ओळख लपवून राहतात.
काहीजणांकडे बनावट आधारकार्ड, बनावट रेशनकार्डही आहेत. त्यातच शहरातील बांधकाम, हॉटेल, एमआयडीसी येथे कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता कामावर ठेऊन त्यांना बाजूलाच भाडोत्री बनवून ठेवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलिस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष या सर्वांकडून बांगलादेशांची आता तरी शोध मोहीम सुरू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर अशा कारवाया सुरू केल्या तर अनेक बांगलादेशींचा फर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
सीमा सील नसल्याचा परिणाम
सीमा सील नसल्यामुळे पश्चिम बंगाल मार्गे हे बांगला देशी अगदी सहज भारतात घुसखोरी करतात. येथेच आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून ते पुणे, मुंबई, सोलापूर सारख्या ठिकाणी येतात. पकडले गेल्यानंतर त्यांच्यावर पारपत्र कायद्यांतर्गत कारवाई होते. त्यानंतर त्यांना शिक्षाही होते. मात्र त्यांचे पुढे काय होते, हे त्या नागरिकांना आणि पोलिसांनाच ठाऊक.
पोलिस आयुक्तालयांतर्गत शहरातील सर्व कारखाने, एमआयडीसी हॉटेल, बांधकाम याठिकाणी काम करणार्या कामगारांची चौकशी केली जाणार आहे. जेथे बाहेरील राज्यातील कामगार काम करतात त्या मालकांनी पोलिस प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे.- एम. राजकुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर