पंढरपूर : येथे उद्या शनिवार, दि.29 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या चैत्री एकादशी सोहळ्याला पंढरीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मात्र चंद्रभागेत स्नान करताना गढूळ, शेवाळ मिश्रीत पाण्याचा सामना करावा लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यात शेवाळ, कचरा, फाटकी कपडे असल्यामुळे पाणी गढूळ झाले आहे. यामुळे बहुतांश भाविक हे चंद्रभागेत स्नान करण्याची इच्छा असूनही केवळ दूषित पाणी असल्याने स्नान करण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसून येते.
पंढरपूर येथे चैत्री यात्रेला आलेला भाविक हा प्रथमत: चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतो. चंद्रभागा स्नान झाल्याशिवाय श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले जात नाही. त्यामुळे चंद्रभागा स्नानाला भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. परंतु, चैत्री यात्रा एकादशी एका दिवसावर येऊनही प्रशासनाने अद्याप स्वच्छ पाणी नदीपात्रात सोडले नाही. त्यामुळे साचलेल्या गढूळ पाण्यातच भाविकांना स्नान करावे लागले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी दोन फुटावर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील फाटकी कपडे, निर्माल्याचे थर साचले आहेत. तर स्वच्छता करण्यात येत नसल्याने साचलेल्या पाण्यात शेवाळ, किडे तयार झाल्याचेही दिसून येत आहे. यातच हिरव्यागार शेवाळाने नदीपात्रातील पाणी व्यापले आहे. भाविक स्नान करण्यासाठी पात्रात उतरला की अंगावर शेवाळ चिटकते. तसेच किडे, शेवाळ भाविकांच्या अंगावर, डोक्यातील केसात चिकटत आहे. यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.