सोलापूर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी आता व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. देशातील टॉपची आयआयटी आणि एनआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई मेन परीक्षा वर्षातून दोनदा होते. आता त्याच पावलांवर पाऊल ठेवून महाराष्ट्रातही सीईटी वर्षातून दोनदा होणार आहे.
पहिल्या प्रयत्नात थोडी गडबड झाली तरी, दुसर्या संधीमध्ये तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. यासोबतच, सीईटी सेल आता स्वतःची परीक्षा केंद्रे उभारणार आहे. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणखी वाढेल. कोणताही घोळ न होता, केवळ गुणवत्तेवर आधारित प्रवेश होतील. पुढील वर्षापासून राज्याबाहेरील सीईटी परीक्षा केंद्रे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच परीक्षा देण्याचा अनुभव मिळेल, बाहेर जाण्याची धावपळ थांबेल.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आयटीआय अशा एकूण 19 वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी घेतली जाते. या सर्व बदलांमुळे सीईटी सेल अधिक सक्षम, विद्यार्थीभिमुख आणि विश्वासार्ह बनणार आहे. कारण आता यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे आता दोन संधी असणार आहेत.