ST Bus (source- MSRTC)
सोलापूर

Solapur News: बस चालक-वाहकांचा मनमानी कारभार; प्रवाशांसाठी ठरतोय त्रासदायक

एसटी महामंडळ व प्रवाशांबद्दल कर्मचाऱ्यांना आत्मीयता कधी वाटणार? प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

मळोली : मळोली (ता. माळशिरस) येथे सद्यस्थितीत एस. टी. कर्मचारी व प्रवाशी यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत खटके उडत आहेत. हे प्रवास करताना दिसून येते. यामध्ये जास्त प्रमाणात महिला व ज्येष्ठ नागरिक यांचे प्रमाण अधिक आढळून येते. शासनाने घेतलेले निर्णय एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांच्या कंठाशी आलेले दिसून येत आहेत.

चालक व वाहक हे लाडक्या बहिणींना दिलेले अर्धे तिकीट फाडताना वाहकांना आपल्या खिशातील पैसे जात असल्याचा भास होत आहे. दात-ओठ खात गाडीत बसण्याच्या अगोदर हे प्रवाशांना सुट्टे पैसे आहेत का?, गाडी याठिकाणी थांबणार नाही?, जागा शिल्लक नाही? अशी उत्तरे देऊन प्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. लांब पल्ल्याच्या गाडीचे चालक व वाहक उड्डाणपूल, गर्दीची ठिकाणी टाळून बस थेट दामटवून पुढे घेऊन जाण्याचा प्रकार सर्रास वाढत आहे.

रात्री मुक्कामावरून आलेली गाडी स्वच्छ न करता ताब्यात घेणे ही जबाबदारी विसरून हे कर्मचारी स्वतःच तंबाखू खाऊन एसटी लाल पिचकाऱ्या मारून खराब करण्याच्या मार्गावर आहेत. नक्की कोणाचा दोष म्हणून हे सर्व सहन करण्याची सर्वसामान्य नागरिकांना वेळ येत आहे. अनेकजण एसटीमध्ये वाद होतात म्हणून खासगी वाहनाने जास्त प्रवास करू लागले आहेत. यासाठी कर्मचारी यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी त्यांना योग्य समुपदेशन करण्याची वेळ आता एसटी महामंडळ यांच्यावर येऊन ठेपली आहे.

यात्रा कालावधीत कोट्यवधी रुपयांनी होणारा नफा योग्य मार्गास लागला तर प्रवाशी व एसटीचे कर्मचारी यांच्यामध्ये होणारे वाद कमी होतील. यासाठी उदाहरण घ्यायचेच झाले तर इतर राज्यातील चालक व वाहक स्वतः खाली उतरून प्रवाशी बोलावून घेतात. त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात.

नुकतीच अकलूज आगाराची अकलूज-साळमुख चालू केलेली बससेवा साळमुख चौकात आल्यावर किमान दहा मिनिटे बस थांबणे आवश्यक आहे. या चौकात सातारा व पंढरपूर या मार्गांवरून अनेक प्रवाशी येत असतात. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुख्य चौकात ही बस वळत असताना सातारा मार्गावरून आलेली बीड-सातारा ही गाडी थांबेपर्यंत अकलूज आगाराची बस निघून गेली. या सातारा आगाराच्या बसमधून आठ ते नऊ प्रवाशी अकलूजला जाणार होते, हे त्या चालकाच्या लक्षात आले नसेल का. केवळ एसटी ही स्वतःची संपत्ती नसून ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे. ग्रामीण भागातील जनतेची नाळ त्याच्याशी जोडली आहे. ती टिकवायची असेल, त्यात वाढ करायची असेल तर एसटी महामंडळास स्वतः मध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडवून आणावेच लागतील, हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT