Pudhari File Photo
सोलापूर

Mass Wedding Ceremony: वऱ्हाडींसाठी बुंदी, चपाती अन्‌‍ भात

लोकमंगलचा सर्वधर्मीय विवाह सोहळा; बावन्न जोडप्यांचा उद्या विवाह

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा उद्या रविवारी (दि.16) होणार आहे. यामध्ये 52 जोडपी विवाह बंधनात अडकणार असून, यावेळी वऱ्हाडी मंडळींना बुंदी, चपाती, आमटी अन्‌‍ भात असे भोजन मिळणार आहे.

लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी सायंकाळी 5.08 वाजता, गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यंदाचे विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष असून, यावेळी 52 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा. या उद्देशाने विवाह सोहळ्याचे आयोजन लोकमंगलकडून करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्व खर्च लोकमंगल फाऊंडेशनमार्फत करण्यात येणार आहे.

वधू-वरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी साहित्यांची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. भोजनव्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाऊंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू-वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत.

यंदाच्यावर्षी विवाह सोहळ्यात जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर जिल्हा पर्यटन थीम राबविण्यात येणार आहे. विवाह सोहळ्याच्या ग्राऊंडवर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये पर्यटनस्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असणारी ठिकाणे, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा दर्शविणारे पॅनेल्स, ऐतिहासिक पर्यटन गावांचे माहिती फलक लावण्यात येणार आहेत.
-सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT