मोडनिंब : सोलापूर-पुणे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुलाचा सुरक्षा कठडा आदर्श नगर येथे तुटलेल्या अवस्थेत असून, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोडनिंब येथील आदर्श नगर परिसरातील पुलावरील सुरक्षा कठडे अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारित येत असतानाही दुरुस्तीच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पुलाच्या कडेला संरक्षण भिंत नसल्यामुळे, विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा अपुऱ्या प्रकाशात, वाहने थेट खाली कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका वाहनाच्या धडकेत पुलाचा सुरक्षा कठडा तुटला होता. त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. परिणामी, दुचाकीस्वार, लहान वाहने तसेच पादचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पुलाखालून सोलंकरवाडी, छोरिया टाऊनशिप, बिनगे मळा तसेच परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशा परिस्थितीत पुलावरील तुटलेले लोखंडी कठडे खाली कोसळल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. अशा दुर्घटनेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
महामार्गावरील अपघातानंतर सुरक्षा कठडे तुटणे ही सामान्य बाब असली, तरी त्याची तातडीने दुरुस्ती न होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असलेले हे कठडे नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहेत. महामार्गावरून टोल वसूल केला जातो; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत. तुटलेले कठडे त्वरित न दुरुस्त केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासन मोठा अपघात झाल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित हायवे प्रशासनाने पुलावरील तुटलेल्या सुरक्षा कठड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास संभाव्य अपघात टाळता येतील आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.